नवी दिल्ली : हिरामंडी या वेबसिरीजमुळे पुन्हा चर्चेत आलेल्या शेखर यांनी आज नवी दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात (बीजेपी) मध्ये प्रवेश केला. सध्या सोशल मीडियावर शेखर यांच्या निर्णयाची चर्चा होतेय.
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी देशभरात सुरु असताना शेखर यांच्या भाजपामधील प्रवेशाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. परंतु ते निवडणूक लढवणार कि नाही हे शेखर यांनी स्पष्ट केलं नाहीये.
बीजेपीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शेखर सुमन म्हणाले कि,"कालपर्यंत मला कल्पना नव्हती कि मी आज इथे पक्षप्रवेश करेन. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी नकळत घडतात. मी इथे खूप सकारात्मक विचार करून आलोय आणि देवाचे आभार आहेत कि त्याने मला हा निर्णय घेण्याचे आदेश दिले."
शेखर यांनी या आधी पटना लोकसभा मतदार संघातून याआधी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. 2009 मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात शेखर यांनी निवडणूक लढवली होती. ते ही निवडणूक हरले होते. त्यांच्यासोबत राधिका खेरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. खेरा यांनी २ दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी राम मंदिरात जाण्यावरून काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान शेखर यांची नुकतीच हिरामंडी द डायमंड बझार ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेबसीरिजमध्ये त्यांनी झुल्फिकार ही नवाबाची भूमिका चांगलीच गाजतेय. या वेबसीरिजमध्ये त्यांनी त्यांचा मुलगा अध्ययन सुमनसोबत काम केलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं तवायफांचं आयुष्य, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं योगदान आणि सत्तेसाठी त्यांच्यात चाललेली लढाई यावर ही सीरिज आधारित आहे. या सीरिजमधील सगळ्या कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय.