मुंबई : संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असताना, मराठी मनोरंजन विश्वावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी मालिका, सिनेमा आणि हिंदी मनोरंजनविश्वातही झळकलेले हरहुन्नरी अभिनेते डॉ .विलास उजवणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता. त्यावर त्यांनी मात केली होती. मात्र नंतर हृदयासंबंधी विकार झाल्याने पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे.
'चार दिवस सासूचे', 'दामिनी', 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. उजवणे यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिरारोड येथील एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अमीट छाप सोडली होती. त्यांच्या सहजसुंदर अभिनय शैलीमुळे ते प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले होते.
सकारात्मक भूमिकांसह त्यांच्या खलनायकी भूमिकाही विशेष गाजल्या होत्या. डॉ. उजवणे यांच्या जाण्याने मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.