बांगलादेशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचार कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडिलांना जमावाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली आहे. अभिनेता शांतो खानचे वडील सलीम खान हे चांदपूर सदर उपजिल्हाच्या लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्ष होते. ते चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकही होते. या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतो खान आणि त्याचे वडील सलीम सोमवारी दुपारी घरातून निघाले असताना फरक्काबाद मार्केटमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतरच त्यांनी जमावाचा सामना केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांनी गोळीबार करून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र नंतर हल्लेखोरांनी सलीम खान आणि शांतो खान यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. सलीम खान मुजीबूर रहमान यांच्यावरील चित्रपटाचे निर्माते होते. सलीम खान आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चांदपूर सागरी सीमेवरील पद्मा-मेघना नदीत अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी सलीम यांना दोषी ठरवण्यात आले होते.
यासाठी ते तुरुंगातही गेले होते. सध्या त्यांच्याविरुद्ध आणखी एक खटलाही सुरू होता. सलीम खान यांचा मुलगा शांतो खान याच्याविरुद्धही ३.२५ कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. वेळेवर संपत्ती जाहीर न केल्याचा आणि बेकायदेशीर संपत्ती मिळवल्याचा आरोपही शांतोवर ठेवण्यात आला होता.