‘देवों के देव.. महादेव’ या लोकप्रिय मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जी बऱ्याच काळापासून मालिकांमध्ये झळकली नाही. छोट्या पडद्यापासून ती सध्या दूर आहे.
यादरम्यान ती पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहेत. परंतु यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण सकारात्मक नाही. कारण पूजा बॅनर्जी आणि तिचा पती कुणाल वर्मा यांच्यासोबत मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. या फसवणुकीत त्यांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी गमावली आहे. यामुळे दोघंही पूर्णपणे खचले आहेत. पूजा आणि कुणालची फसवणूक त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने केली आहे. ही वेळ आम्हा दोघांसाठी खूप कठीण असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दोघांनी याबद्दलची माहिती दिली.
या व्हिडीओमध्ये पूजा म्हणाली, “आमच्यासाठी गेले दोन-तीन महिने खूप कठीण होते. आम्हाला कळत नव्हतं की आता पुढे काय होणार? आमची आर्थिक फसवणूक झाली. त्यात आम्ही खूप मोठी रक्कम गमावली. त्यामुळे आम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागत आहे. आम्हाला हार मानायची नाहीये. या फसवणुकीत आम्ही आमच्या बचतीचे सर्व पैसे गमावले आहेत. मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला पाठिंबा द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्हाला देवावर पूर्ण विश्वास आहे.”
या घटनेचा परिणाम पती कुणालवरही खूप झाल्याचं तिने सांगितलं आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी ती चाहत्यांवर अवलंबून आहे.
यादरम्यान पूजाने फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची ओळख तर सांगितली नाही, परंतु तो जवळचाच मित्र होता, याचा खुलासा केला. याबद्दल सांगताना पूजा भावूक झाली होती. कुणालनेही त्याच्या मित्राबद्दल म्हटलं, “जेव्हा तुम्ही एखाद्यावर तीन वर्षांपासून विश्वास करता आणि तो प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत असतो, तेव्हा ती व्यक्ती तुमच्या कुटुंबाचाही एक भाग बनते.”
पूजा आणि कुणालने पुढे म्हटलंय, “आमचा विश्वासघात झाला, आमच्यासोबत इतकी मोठी फसवणूक झाली. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. कारण आम्ही आतून खूप खचलोय. परंतु आणि हार मानणार नाही. त्यातून बाहेर पडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आमच्याकडून कधी कोणती चूक झाली असेल तर आम्ही देवाचीही माफी मागितली आहे. आम्ही खूप रडलोय. इतके दिवस आम्ही अक्षरश: वेडे झालो होतो. आता आम्हाला आणखी रडायचं नाहीये. म्हणूनच हा व्हिडीओ बनवतोय. असं म्हणतात जेव्हा तुम्ही तुमचं दु:ख इतरांसोबत शेअर करता, तेव्हा तुमचं मन हलकं होतं. जे कोणी हा व्हिडीओ पाहत आहेत, त्यांनी कृपया आम्हाला पाठिंबा द्या. आम्ही केवळ प्रामाणिकपणे आमचं काम केलंय, कधीच कोणती हेराफेरी केली नाही. त्यामुळे आमच्यासाठी हे सर्व खूप धक्कादायक आहे.” या व्हिडीओ नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत पूजा आणि कुणालला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.