'तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका अनेकांच्या गळ्यातील ताईत राहिलेली आहे. जेवण करताना अनेकांना ही मालिका बघितल्याशिवाय जणू
जेवण जात नाही. या सुप्रसिद्ध हिंदी मालिकांत प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही कलाकारांनी काही कारणास्तव मालिका सोडली आहे. मात्र आजही त्यांचा अभिनय अनेकांच्या हृदयात कोरला गेला आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभेनेत्री दिशा वकानी हिने मालिका सोडली आहे. मात्र अभिनेत्री मालिकेत परत केव्हा येणार याची विचारणा प्रेक्षकाकडून नेहमीच होत असते.
दरम्यान मालिकेतुन जेनिफर मिस्त्री बाहेर पडल्यानंतर अनेकदा चर्चेत आली. ती अनेकदा तिचा मालिकेत काम करतानाचा आणि सहकलाकारांबरोबरचा अनुभव याबद्दल बोलताना दिसते. ती मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकाणीबद्दलही बोलत असते. अशातच आता ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत ती याबद्दल पुन्हा एकदा बोलली आहे. यावेळी तिनं दिशा वकाणी आता मालिकेत पुन्हा कधीच येणार नाही, असं म्हटलं आहे.
दिशा वकाणीनं लग्नानंतर मालिकेतून ब्रेक घेतला. ती गरोदर असतानाही शोसाठी शूटिंग करत होती. परंतु, मुलीच्या जन्मानंतर तिनं ब्रेक घेतल्यानंतर ती पुन्हा शोमध्ये परतलीच नाही. अशातच आता जेनिफर मिस्त्रीनं दिशा पुन्हा कधीच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये झळकणार नाही आणि त्यामागे काही कौटुंबिक कारण असल्याचंही तिनं म्हटलं आहे.
जेनिफर मिस्त्री म्हणाली, “दिशा तर पुन्हा येणार नाही. दया आली तर येईल.” जेनिफर म्हणाली दयासाठी दुसऱ्या कोणाची निवड होऊ शकते; पण दिशा वकाणी पुन्हा ते पात्र साकारणार नाही. ती याबद्दल पुढे म्हणाली, “दिशा मधे एकदा येणार होती. ती आमच्याशी बोलली होती त्याबद्दल २०२१ दरम्यान. ती आलेली. दुसऱ्या दिवसापासून तिचं शूट होतं. ड्रेस वगैरे ट्राय करून गेलेली; पण त्यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं ते माहीत नाही आणि ती पु्न्हा आली नाही.”
जेनिफर दिशा वकाणीबद्दल म्हणाली, “जेवढं आम्ही ऐकलंय, त्यानुसार तिच्या कुटुंबाच्या काही अटी होत्या की रविवारी शूटिंग नाही करायचं. रात्रीचं शूट नाही करायचं आणि जास्त तास काम नाही करणार वगैरे. त्यामुळे तडजोड तरी किती करणार.”