मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले अभिनेते योगेश महाजन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती चाहत्यांना दिली.
‘अत्यंत दु:खद अंत:करणाने हे सांगतोय की आमचे आवडते योगेश महाजन यांचं आकस्मिक निधन झालं. 19 जानेवारी 2025 रोजी कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालंय. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रपरिवारासाठी हा खूप मोठा धक्का आहे. सोमवारी 20 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’, अशी माहिती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे देण्यात आली.
योगेश महाजन यांच्या पार्थिवावर मुंबईतील बोरिवली इथल्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
योगेश महाजन यांनी अनेक मराठी चित्रपट आणि काही हिंदी पौराणिक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी ते उमरगावला गेले होते. या मालिकेत त्यांनी शुक्राचार्य यांची भूमिका साकारली होती.
मीडिया रिपोट्सनुसार, शनिवारी संध्याकाळी जेव्हा मालिकेचं शूटिंग संपलं, तेव्हा योगेश यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतलं आणि रात्री ते हॉटेलच्या रुममध्या झोपायला गेले. मात्र रविवारी सकाळी ते शूटिंगसाठी सेटवर आलेच नव्हते.
योगेश सेटवर न आल्याने मालिकेच्या टीममधील सदस्यांनी काळजी व्यक्त केली. त्यांनी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र योगेश यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जेव्हा त्यांच्या हॉटेल रुमचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा ते बेडवर झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. तोपर्यंत कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं होतं.