मुंबई : दिवंगत पंडित जसराज यांच्या पत्नी आणि चित्रपट निर्माते डॉ. व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा पंडित जसराज यांचं निधन झालं आहे. २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी त्यांनी वयाच्या ८६व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. वयाशी संबंधित आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मधुरा यांनी त्यांचे पती पंडित जसराज यांच्यासोबत अनेक माहितीपट आणि नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. यासोबतच त्यांनी पंडित जसराज यांचं चरित्रही लिहिलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मधुरा यांची प्रकृती ठीक नव्हती. मधुरा चित्रपट निर्मात्या, लेखक आणि संगीत प्रेमी होत्या. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील वर्सोवा येथे त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मधुरा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ४ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मधुरा पंडित जसराज यांनी दोन चित्रपट केले होते. त्याचबरोबर अनेक माहितीपट चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. इतकंच नव्हे तर मधुरा यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. यात 'मॅन हू चेंज्ड इंडियन सिनेमा' आणि 'शांताराम यांचे ५५० पानांचे मराठी चरित्र' या पुस्तकांचा समावेश आहे. मधुरा यांनी २०१० मध्ये 'आई तुझा आशीर्वाद' हा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. वयाच्या ७३ व्या वर्षी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. त्यामुळे त्यांची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात वयस्कर आणि नवोदित दिग्दर्शक नोंद झाली. या चित्रपटात पंडित जसराज आणि दिवंगत लता मंगेशकर यांची मराठी गाणी आहेत.
दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या त्या कन्या होत्या. त्यांचा विवाह १९६२ मध्ये पंडित जसराज यांच्याशी झाला. १९५४ मध्ये एका संगीत कार्यक्रमात दोघांची भेट झाली. पंडित जसराज यांचं ऑगस्ट २०२० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र आता मधुरा जसराज पंडित यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.