‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता पवनदीप राजन याच्या कारचा सोमवारी पहाटे 3.40 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
झालेल्या पवनदीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पवनदीप जखमी अवस्थेत दिसत असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करताना पहायला मिळत आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , अहमदाबादमध्ये हा अपघात झाला आहे. पवनदीपवर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. तो पूर्णपणे शुद्धीवर आहे. डॉक्टरांची टीम त्याची देखभाल करत आहे. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो. व्हिडीओत पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाल्याचं दिसतंय.
पवनदीपने ‘इंडियन आयडॉल’च्या बाराव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्याला ट्रॉफी, कार आणि 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. पवनदीपने अंतिम फेरीत पाच स्पर्धकांना मात दिली होती. काही दिवसांपूर्वीच 27 एप्रिल रोजी पवनदीपने त्याचा वाढदिवस साजरा केला होता.
कोण आहे पवनदीप राजन?
पवनदीप हा मूळचा उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्याचा असून त्याचे वडील सुरेश राजन, आई सरोज राजन आणि बहीण ज्योतीदीप राजन हे कुमाऊंनी लोककलाकार आहेत. इंडियन आयडॉलचं विजेतेपद जिंकण्याआधी त्याने 2015 मध्ये ‘द व्हॉइस ऑफ इंडिया’ची ट्रॉफी जिंकली होती. या शोमध्ये वेगवेगळ्या गायकांचे टीम होते. त्यापैकी गायक शानच्या टीममध्ये पवनदीप सहभागी होता. त्यावेळी त्याला ट्रॉफीसह 50 लाख रुपयांचं बक्षीस आणि एक कार भेट म्हणून मिळाली होती.
पवनदीपने चंपावतमधील ‘युनिव्हर्सिटी सीनिअर सेकंडरी स्कूल’मधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने उत्तराखंडमधील कुमाऊं विद्यापिठातून पदवीचं शिक्षण घेतलं. पवनदीपने वयाच्या दुसऱ्या वर्षी सर्वांत लहान तबलावादकाचा पुरस्कार मिळवला होता.
2021 मध्ये उत्तराखंड राज्याच्या कला, संस्कृती आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पवनदीपला उत्तराखंडचा कला, पर्यटन आणि संस्कृती ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केलं.