वणी- नाशिक रस्त्यावरील कृषी उत्पन्न समितीसमोर अल्टो कार व दुचाकीच्या अपघातात सात जण ठार झाले आहेत.वणी रोडवर अल्टो कार मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या नादात तेथेच असलेल्या एका नाल्यात पडली. यावेळी गाडीतून बाहेर पडता न आल्याने गाडीतील सर्व प्रवाशांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरूष आणि एक 2 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मृत व्यक्ती एम.एच. 04 डी.वाय. 6642 या क्रमांकाच्या अल्टो कारमधून नाशिकहून कोशिंबे येथे जात होते. अल्टो कारमधील गांगुर्डे कुटुंबिय त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले होते. यानंतर परत दिंडोरीतील कोशिंबे येथे परतत असताना हा अपघात घडला.या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे - देविदास पंडित गांगुर्डे (वय 28, रा. सारसाळे, ता. दिंडोरी), मनीषा देविदास गांगुर्डे (वय 23, रा. सारसाळे, ता. दिंडोरी), उत्तम एकनाथ जाधव (वय 42, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी), अल्का उत्तम जाधव (वय 38, रा. कोशिंबे, ता. दिंडोरी), दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय 45, रा. देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी), अनुसया दत्तात्रय वाघमारे (वय 40, रा. देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी), भावेश देविदास गांगुर्डे (वय 2, रा. सारसाळे, ता. दिंडोरी).
या अपघातात मंगेश यशवंत कुरघडे (वय 25) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय 18) हे दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करीत आहेत.