मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर जानेवारी 2021 ते जून 2025 या कालावधीत तब्बल 500 हून अधिक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 300 हून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. त्यात आज पुन्हा येथे मोठा अपघात झाला. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने वाहनांना धडक दिली.
या भीषण अपघातात 25 ते 30 वाहने एकमेकांवर आदळली असून 30 ते 35 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आणि स्थानिक बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत जखमींना वाहनांमधून बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी मुंबई- द्रुतगती मार्गावर अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, शनिवारी झालेल्या कंटेनर अपघाताने घाटातील अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.