छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना ट्रकने चिरल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना संभाजीनगर - जळगाव राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद परिसरातील गणपती मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देत सुमारे १०० फूटांपर्यंत फरपटत नेलं. या अपघातामध्ये ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपालसिंग चंदनशे , ऋदय गोपाल चंदनशे (वय ८ वर्ष), अवनी गोपाल चंदनशे (वय ९ वर्षे) यांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. तर मीना गोपालसिंग चंदनशे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या डोळ्यादेखत नवरा आणि दोन चिमुकल्यांचा जीव गेला यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोपालसिंग चंदनशे हे बायको आणि दोन मुलांसह साताळ फाट्याजवळ आळंदकडून सिल्लोड महामार्गाने गावाकडे जात होते. त्याचवेळी सिल्लोडकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धकडेनंतर ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. अपघातामध्ये दुचाकीवरील महिला बाजूला फेकली गेल्याने गंभीर जखमी झाली.
सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करत पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला. या प्रकरणी वडोद बाजार पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.