दिंडोरी हे खासदार भास्कर भगरे आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कार्यक्षेत्र आहे. मात्र यातील कोणाला मतदार स्वीकारतात याची चर्चा आहे. लोकसभा आणि विधानसभेचा ट्रेंड कायम ठेवण्यासाठी प्रस्थापितांचे प्रयत्न आहेत.
दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री नरहरी झिरवाळ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे खासदार आहेत. या दोघांनाही आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात स्थिर करण्याची इच्छा आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यातील ही पक्षांना गळती लागली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांचे विरोधक असलेले नेते भाजप आणि शिंदे पक्षात विखुरले गेले आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजप प्रवेश केला. त्याचबरोबर पत्नी, जिल्हा परिषद सदस्या सुनीता चारोस्कर यांनीही उमेदवारीसाठी पतीचे अनुकरण केले. भाजप महायुतीचा घटक आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री झिरवाळ म्हणतील पक्षात आणि दिंडोरीत पूर्व दिशा असेल.
दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्षात फारसा फरक नाही. त्यामुळे लोकसभेला सर्व कार्यकर्त्यांचा कल शरद पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्याकडे होता. विधानसभेला तो मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बाजूने दिसला.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री झिरवाळ यांचे विरोधक कार्यरत होते. या सर्व विरोधकांनी आता वेगवेगळ्या पक्षांचा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे विरोधक विविध पक्षांत विखुरल्याने त्यांनी व्यक्तिगत राजकारणाला प्राधान्य दिले आहे.
दिंडोरी मतदारसंघातील ही सर्व स्थिती मंत्री झिरवाळ यांच्या पथ्यावर पडली आहे. पेठ तालुक्यातील दोन आणि दिंडोरीतील सहा अशा सर्व आठ गट आणि त्यांच्या गणात झिरवाळ यांच्याकडे प्रबळ उमेदवार आहेत. त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मुलगा गोकुळ झिरवाड यांनी अहिवंतवाडी गटातून उमेदवारीचा निर्णय जाहीर केला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे राजकारण आमदार सांगेल त्या कलाने होत असते. आमदारांच्या निधीतूनच या गटांमध्ये विकास कामे होतात. त्याचा प्रभाव कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत स्तरावरील नेत्यांवर असतो.
या माध्यमातूनच मंत्री झिरवाळ यांची प्रत्येक गटात यंत्रणा सक्रिय केली आहे. मंत्री झिरवाळ यांची सध्या तरी महायुतीला बाजूला ठेवून स्वबळाची तयारी आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांमुळे जिल्हा परिषद निवडणुका बहुरंगी होणार आहे. झिरवाळ यांच्या स्वबळाच्या तयारीने त्यात अधिक रंगत येण्याची चिन्हे आहेत.