भाजपची चिंता वाढणार; माजी खासदार बंडखोरीच्या तयारीत?
भाजपची चिंता वाढणार; माजी खासदार बंडखोरीच्या तयारीत?
img
Dipali Ghadwaje
दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीने काही मंडळी नाराज आहेत. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण मतदारसंघात फिरून निवडणुकीबाबत चाचपणी करीत आहेत.

दिंडोरी मतदारसंघात कांदा निर्यातबंदी आणि द्राक्षांचे कोलमडलेले भाव यांसह विद्यमान खासदारांचा घटलेला संपर्क ही भाजपच्या उमेदवारापुढे प्रमुख समस्या आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे यांनी आपल्या प्रचारात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिला आहे. त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या प्रचाराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातून भाजपसाठी दिंडोरीतील यंदाची लढत सोपी नाही, असा संदेश गेला आहे.

दिंडोरी मतदारसंघात तीन टर्म प्रतिनिधित्व केलेले भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सध्याच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करून बंडखोरीचे संकेत दिले आहेत.

गेले आठवडाभर त्यांनी मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला आहे. विशेषत: भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर त्यांचा भर आहे. या गाठीभेटींमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्यावर अन्याय झाला आहे. विद्यमान खासदारांकडून गेल्या पाच वर्षांत चव्हाण यांचा योग्य मानसन्मान केला जात नसल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. या नाराजीतूनच भाजप बंडखोरीची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेक पदाधिकारी ही बंडखोरी थांबवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

चव्हाण यांच्या बंडखोरीचा फटका भारती पवार यांना बसू शकतो. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मध्यस्थी करावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात दिंडोरी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत.

 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group