सलमान खानचे चाहते ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. धमाकेदार टीझर, ट्रेलर गाण्यांमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कारण गेल्यावर्षी सलमान खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नव्हता.
‘सिंघम अगेन’ आणि ‘बेबी जॉन’ या चित्रपटांमध्ये फक्त त्याचा कॅमिओ पाहायला मिळाला होता, त्यामुळे ‘सिकंदर’ चित्रपटाचं प्रदर्शन भाईजानच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. पण, पहिल्याच दिवशी ‘सिकंदर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिवर जादू फिकी पडल्याचं दिसत आहे.
सलमान खान व रश्मिका मंदाना अभिनीत ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ए.आर.मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही.
सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सलमानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचं कोणी भरभरून कौतुक करत आहे, तर कोणी ट्रोल करत आहे.
सलमान, रश्मिकाच्या अभिनयासह कथानक अनेकांच्या पसंतीस उतरलं नाही. पण, ‘सिकंदर’ चित्रपटाने पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या.
सलमानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी २६ कोटींचा व्यवसाय केला आहे. सकाळी ‘सिकंदर’ची सुरुवात संथ गतीने झाली. सकाळच्या शोमध्ये १३.७६ टक्के ऑक्युपन्सी होती. त्यानंतर संध्याकाळच्या शोमध्ये ऑक्युपन्सी वाढली आणि रात्री पुन्हा ऑक्युपन्सी घटली.