बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअॅपवर वॉईस नोटद्वारे जीवेमारण्याची धमकी देण्यात आलेली. त्यापूर्वीच सलमान खानच्या घरावरील गोळीबार अन् त्यानंतर निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानं अख्ख्या बॉलिवूडला हादरवून सोडलं. अशातच आता पुन्हा एकदा सलमान खानच्या घरी धमकीचा ई-मेल आला आहे. सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माला धमकीचा ई-मेल आला आहे. अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवरून धमकी मिळाल्याच्या एका दिवसानंतर आयुष शर्मा याला देखील धमकी देण्यात आली आहे.
माहितीनुसार, सध्या कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी, अभिनेता आयुष शर्माला मिळालेल्या धमकीच्या ईमेलची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने सांगितलं की, आयुषला बुधवारी म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी ही धमकी मिळाली आहे. गुन्हे शाखा हा ईमेल खरा आहे की कोणीतरी केलेला विनोद आहे याची पडताळणी करण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा अभिनेता रणवीर सिंग याला देखील अज्ञात व्यक्तींकडून व्हॉट्सअॅपवर धमक्या मिळाल्या आहेत. धमकी मिळाल्यानंतर रणवीर आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.