अभिनेता सलमान खानच्या घरासमोर गोळीबार करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या घरावर एकूण सहा राऊंड फायर केले. दरम्यान गोळीबार करणाऱ्या त्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे.
गुजरातच्या भूजमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली असून, प्राथमिक चौकशीत या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. विक्की साहब गुप्ता वय 24 आणि सागर श्रीजोगेंद्र पाल वय 21 अशी या आरोपींची नावं आहेत. दरम्यान आरोपी गोळीबारापूर्वी पनवेलमध्ये ज्या घरात थांबले होते, त्या घराच्या मालकाला आणि गुन्ह्यासाठी ज्याची दुचाकी वापरण्यात आली त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर फायरिंग करण्यापूर्वी हे आरोपी पनवेलमध्ये एका घरात 22 दिवस थांबले होते. या घराच्या मालकाला तसेच आरोपींनी गुन्ह्यासाठी ज्या दुचाकीचा वापर केला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सलमानच्या घरासमोर फायरिंग केल्यानंतर आरोपींनी गुजरातच्या कच्छला पलायन केलं. त्यांचा असा अंदाज होता की, पोलीस त्यांना शोधण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारला जातील, म्हणून ते कच्छला गेले. तिथे ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहिले. मात्र तात्रिंक बाबींचा अभ्यास करून अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
नेमकं काय आहे प्रकरण?
रविवारी पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या मुंबईस्थित घरासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. आरोपींनी एकूण सहा राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी सलमान खानच्या घराच्या बालकनीत देखील झाडण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट देखील व्हायरल झाली होती. या प्रकरणातील आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे.