सध्या मनोरंजन क्षेत्रात बॉर्डर 2 चित्रपटावरून वाद सुरू आहे. दिलजीत दोसांजच्या कास्टिंगवर द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लॉईजने चित्रपटाच्या निर्मात्यांना एक पत्र धाडलं होतं. दिलजीत दोसांजला या चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. चित्रपटातील त्याचे सीन्स अन्य अभिनेत्याकडून करुन घ्यावेत असेही या पत्रात म्हटले आहे.
खरंतर हे प्रकरण पाकिस्तानी अभिनेत्री हानिया अमीरबरोबर दिलजीत दोसांझने सरदारजी 3 या चित्रपटात काम केल्यानंतर सुरू झालं. या चित्रपटास भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यात आलं.
रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की टी सिरीजचे मालक भूषण कुमार दिलजीतला बॉर्डर 2 मधून बाहेरचा रस्ता दाखवतील. परंतु, यानंतर काल दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर करत चर्चांना फुलस्टॉप दिला.
FWICE चे प्रमुख बीएन तिवारी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना या प्रकरणी काही अपडेट्स दिले. आम्ही भूषण कुमार यांची अनेकवेळा भेट घेतली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की चित्रपटाचे शुटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. काही भाग अजून बाकी आहे. गाण्यांचे चित्रीकरण बाकी आहे. जर यावेळी दिलजीतला चित्रपटातून काढून टाकलं तर मोठं नुकसान होईल. आम्हालाही त्यांचं म्हणणं योग्य वाटलं आणि आम्ही बॉर्डर 2 वरील बंदी मागे घेतली आहे.
FWICE कमिटीचे सल्लागार अशोक पंडित यांनी सांगितले की भूषण कुमार यांनी लेखी दिले आहे की दिलजीत दोसांझला त्यांच्या प्रोडक्शन हाउसअंतर्गत कोणत्याही चित्रपटासाठी कास्ट केले जाणार नाही. आता चित्रपटाचे 80 ते 85 टक्के शुटिंग पूर्ण झाले आहे.
चित्रपटातील दिलजीतचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. चित्रपट पूर्ण होऊ देण्यासाठी भूषण कुमारने फेडरेशनकडे परवानगी मागितली आहे. भविष्यात दोसांझला कास्ट केले जाणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात भूषणकुमार लवकरच एक पत्र देणार आहेत.