बॉलिवूडच्या सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कतरीना कैफ. अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब आहे. मेरी ख्रिसमस या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.
यानंतर तिचा कोणताच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला नाही. तर तिचा नवरा विकी कौशल मात्र एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट करत आहे. लवकरच तो आगामी ‘छावा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे कतरिना सध्या तिच्या संसारात रमली आहे. अभिनेत्री पडद्यावरुन गायब असली तरी सोशल मीडियावर तिच्या चर्चा नेहमीच होताना दिसतात.
कतरिना कैफने नुकतंच सासूबरोबर शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यांच्या दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कतरिना कैफ आता अगदी पंजाबी सून झाली आहे. तिच्या खाण्यापिण्याच्या सवयीही अगदी पंजाबी झाल्या आहेत. विशेष म्हणजे कतरिना विकीबरोबर सासू सासऱ्यांच्या घरीच राहते. सासूबाईंबरोबर तिचा खास बॉण्ड आहे आणि हे अनेकदा काही फोटोंमधून दिसूनही आलं आहे. अशातच नुकतीच कतरिना सासूबरोबर शिर्डीला पोहोचली. तिथे दोघींनी साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं.
यावेळी कतरिनाने पंजाबी ड्रेस घातला होता तर डोक्यावर पांढरी ओढणी घेतली होती आणि सासू-सूनेचा साईबाबांच्या दर्शनाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये कतरिना हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. त्यानंतर तिने साईबाबांच्या चरणी माथा टेकवल्याचे व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.