एकीकडे पुष्पा २ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे तर दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुनावर संकटांवर संकट वाढत आहे. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांसाठी तुरुंगवास भोगावा लागणार आहे. पुष्पा २ च्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याला आरोपी म्हणून अटक करण्यात आले आहे.
हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी, १३ डिसेंबर रोजी अभिनेत्याला त्याच्या घरातून अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनला सायंकाळी न्यायालयात हजर केले. जिथे न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
तेलगू मेगास्टार अल्लू अर्जुनवर ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये त्याच्या पुष्पा-२ चित्रपटाच्या प्रीमियरला न कळवता आल्याचा आरोप आहे. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ऑटोग्राफ घेण्याच्या प्रयत्नात हाणामारी झाली.
यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. एकमेकांवर पडून अनेक जण जखमी झाले. तर एका महिलेचा या चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन, अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
शुक्रवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले की, महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वांवर गंभीर आरोप आहेत.
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले की, अभिनेत्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. त्याचवेळी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.