ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं शुक्रवारी, 4 एप्रिल 2025 रोजी निधन झालं.
मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत 'भरत कुमार' म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये 'भारत कुमार' म्हणून ओळख मिळाली.
हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मधे दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
मनोज कुमार यांचा राजा खोसला यांचा 1964 मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला 'वो कौन थी?' सुपरहिट ठरला. या चित्रपटातील 'लग जा गले' आणि 'नैना बरसे रिमझिम' ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.
दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील एका पंजाबी जाही हिंदू ब्राम्हण कुटुंबात झालेला. मनोज कुमार यांंचं खरं नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. फाळणीनंतर मनोज कुमार 10 वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब जंदियाला शेरखान इशून दिल्लीला स्थलांतरीत झालं.
मनोज कुमार यांचे गाजलेले चित्रपट
मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब औऱ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचं तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केलं होतं.
मनोज कुमार यांनी 'सहारा' (1958), 'चांद' (1959) आणि 'हनीमून' (1960) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यानंतर त्यांना 'कांच की गुडिया' (1961) मिळाला ज्यामध्ये ते पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसले. यानंतर 'पिया मिलन की आस' (1961), 'सुहाग सिंदूर' (1961), 'रेश्मी रुमाल' (1961) हे चित्रपट त्यांनी केले.
1962 मध्ये विजय भट्ट यांच्या 'हरियाली और रास्ता' या चित्रपटानं त्यांना सर्वात मोठं यश मिळालं, जो व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला. या चित्रपटात माला सिन्हा होत्या. 'हरियाली और रास्ता', 'शादी' (1962) च्या यशानंतर 'डॉ. विद्या (1962) आणि गृहस्थी (1963), या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.