बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची लढाई जितकी रंजक असेल, तितकीच समस्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपुढे निर्माण होणार आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ आणि ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटांची टक्कर पहायला मिळतेय. अहान पांडेच्या ‘सैयारा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून दमदार कामगिरी केली आहे. 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
परंतु अहान पांडेच्या या चित्रपटाला आता सर्वांत मोठा झटका मिळाला आहे. अवघ्या 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘महावतार नरसिम्हा’ने धूळ चारली आहे.
गेल्या आठवड्यात मोठ्या दाक्षिणात्य अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘हरिहर वीरामल्लू’च्या पहिल्या भागाला भारतात विशेष प्रतिसाद मिळाला नाही. परंतु ज्या चित्रपटाने ‘सैयारा’ला पछाडलं आहे, त्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
‘होम्बाले फिल्म्स’ निर्मित ‘महावतार नरसिम्हा’च्या अॅनिमेशनचं खूप कौतुक होत आहे. याच कारणामुळे या चित्रपटाने बजेटच्या कितीतरी पट अधिक कमाई केली आहे. इतकंच नव्हे तर ‘बुक माय शो’ या अॅपवरही या चित्रपटाची तिकिटं ‘सैयारा’पेक्षा अधिक विकली गेली आहेत.
‘महावतार नरसिम्हा’ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी 7.50 कोटी रुपये कमावले आहेत. विशेष बाब म्हणजे हा दाक्षिणात्य चित्रपट असूनही इतर भाषेतील प्रेक्षकांकडूनही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटाने ‘हिंदी’ व्हर्जनमधून 5.5 कोटी रुपये कमावले आहेत. तर कन्नडमधून 14 लाख, तेलुगूमधून 2 कोटी, तमिळमधून 5 लाख रुपयांची कमाई झाली.
‘महावतार नरसिम्हा’ने भारतात आतापर्यंत 37.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कथा, दिग्दर्शक आणि उत्तम व्हीएफएक्सच्या जोरावर या चित्रपटाने ही कमाल केली आहे. सहा दिवसांत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. भगवान विष्णू यांच्या चौथ्या अवताराच्या कथेला चांगला प्रतिसाद मिळतोय.
‘सैयारा’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 13 दिवस पूर्ण झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची चांगली पकड दिसून येत आहे. 13 व्या दिवशी भारतात या चित्रपटाने 7 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटातील भारतातील एकूण कमाई 273.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.