स्टार प्रवाह वाहिनी गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली, लग्नानंतर होईलच प्रेम यासारख्या लोकप्रिय मालिकांसोबतच आता होऊ दे धिंगाणा. मी होणार सुपरस्टारसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम स्टार प्रवाहने महाराष्ट्राला दिले आहेत.
सतत नावीन्याची कास धरणारी ही वाहिनी असाच एक भन्नाट कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे शिट्टी वाजली रे .
आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात शिट्टीला महत्त्वाचं स्थान आहे. लहानपणी खेळणं म्हणून मिळालेली शिट्टी नकळतपणे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जाते. त्यामुळेच कुक्करची शिट्टी एखाद्या गृहिणीसाठी जितकी खास असते, तितकीच ट्रॅफिक रोखणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांसाठी देखील.
शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे. मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पहाणं मजेशीर ठरणार आहे. कारण कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पहातच असतो. मात्र त्याचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य शिट्टी वाजली रेच्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे.
सहजरित्या आपल्या अभिनयाने मनं जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का? याची पोलखोल शिट्टी वाजली रे चा मंच करणार आहे. थोडक्यात काय… पोटभर खायला घालणारी नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरण्टच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.
या कार्यक्रमाविषयी सांगताना अमेय वाघ म्हणाला, ‘शिट्टी वाजली रे कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास 10 वर्षांनंतर मी टीव्ही विश्वात पुनरागमन करतोय. स्टार प्रवाहसोबत जवळपास 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहच्या सुरुवातीच्या काळात मी गोष्ट एका जप्तीची नावाच्या मालिकेत काम केलं होतं. मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे.
त्यामुळे शिट्टी वाजली रे कार्यक्रमासाठी विचारणा झाली, तेव्हा तातडीने होकार दिला. मला आणि माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक येत नव्हता मात्र लॉकडाऊनमुळे आम्ही दोघंही स्वयंपाक करायला शिकलो. तेव्हापासून मला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. कुणी विश्वास ठेवणार नाही, मात्र मी आता नियमित स्वयंपाक बनवतो.
यानिमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट मला कळली ती म्हणजे आपली आई, मावशी, काकू, बहिण, पत्नी ज्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतात, घरासाठी राबतात त्यांचं किती कष्टाचं काम आहे, याची जाणीव मला झाली. शिट्टी वाजली रे कार्यक्रमात अनेक कलाकार सामील होणार आहेत. त्यांच्यासोबतची धमाल-मस्ती या मंचावर अनुभवता येणार आहे. मी या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहे, अशी भावना अमेय वाघने व्यक्त केली.
या भन्नाट कार्यक्रमात निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामुळे पोटभर हसायचं असेल तर शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचा एकही भाग पाहायला चुकवू नका. पाहायला विसरु नका शिट्टी वाजली रे 26 एप्रिल पासून रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.