भीषण अपघात! ‘कांतारा’ सिनेमाच्या टीमची बस उलटली ; कुठे घडली घटना?
भीषण अपघात! ‘कांतारा’ सिनेमाच्या टीमची बस उलटली ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
कर्नाटकात सध्या 'कांतारा चॅप्टर 1' सिनेमाचं शूटींग सुरु होतं. पण सध्या या सेटवरुन एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक ज्युनियर कलाकारांना दुखापत झाली आहे. तसेच एक ज्युनिअर कलाकार गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जातंय. 

सध्या या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक तपासणी केली जातेय.  यामध्ये अनेक कलाकारांना दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे. कलाकारांच्या संपूर्ण टीमच्या बसलाच हा भीषण अपघात झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चित्रपटाच्या टीमला घेऊन जाणारी मिनी बस  उलटली. "जडकलमधील मुदूर येथे शूटिंग पूर्ण करून ते कोल्लूरला परतत असताना ही घटना घडली," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मिनी बसमध्ये 20 कनिष्ठ कलाकार होते. घटनेनंतर जखमींना जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सध्या या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. या अभिनेत्यांच्या उपचाराची जबाबदारी प्रॉडक्शन हाऊस घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

'कंतारा' 2022 साली रिलीज झाला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अवघ्या 16 कोटींमध्ये तयार झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 207 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. सिनेमॅटोग्राफी, उत्तम दिग्दर्शन आणि कथानक या गोष्टींमुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.  या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. हा आता या सिनेमाचा प्रीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group