अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झालं असून त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पावणे पाच वाजता ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून पोलिसांनी बंदूक ताब्यात घेतली आहे.
दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होते . त्यामुळे नेमकं काय घडलं याबाबत अजून स्पष्टता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, दुर्घटनेनंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अंधेरीच्या क्रिटी केयर रुग्णालयात गोविंदा यांना दाखल करण्यात आलं. गोविंदा यांच्या गुडघ्यात गोळी घुसल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलं आहे. गोविंदा यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, गोविंदा यांच्या मुलीनं एका वृत्त संस्थेशी
बोलताना त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गोविंदा यांच्यासोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे चाहते चिंतेत असून गोविंदा यांच्या प्रकृतीसाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.
गोविंदा यांच्या मुलीनं दिली हेल्थ अपडेट
गोविंदा यांची मुलगी टीना आहूजा यांनी सांगितलं की, मी आता रुग्णालयात आहे, पप्पांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आता मी जास्त बोलू शकत नाही. पण, पप्पांची तब्येत आता स्थिर आहे. गोळी लागल्यानंतर पप्पांचं ऑपरेशन करण्यात आलं असून ऑपरेशन यशस्वी पार पडलं आहे. सर्व तपासण्या डॉक्टरांकडून सुरू आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आले असून रिपोर्ट्सही व्यवस्थित आहेत. कमीत कमी 24 तास पप्पांना आयसीयूमध्ये ठेवणार आहे.
नेमकं काय घडलं?
गोविंदा यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. दुर्घटना घडली त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होते. त्यामुळे नेमकं काय घडलं हे स्पष्ट होत नाही. पण समोर आलेल्या माहितीनुसार, ते सकाळी बाहेर जाण्यासाठी आपल्या गाडीनं बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी गाडीत बसताना गोविंदा यांच्याकडील पिस्तुलमधून चुकून गोळी सुटली आणि ती थेट पायात शिरली, असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे, असं सांगितलं जात आहे की, गोविंदा पहाटे घरात एकटेच होते. ते आपली बंदूक साफ करत होते. त्यावेळी त्यांच्याकडून चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. गोविंदा यांच्या गुडघ्यात गोळी घुसली.
दरम्यान, गोविंदा यांच्यावर सध्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.