बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या आरोपीची खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय दास असे आरोपीचे नाव आहे. काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साईटजवळ असलेल्या लेबर कॅम्पमधून त्याला अटक करण्यात आली आहे.
विजय दास हा सुरुवातीला ठाण्यात हिरानंदनी परिसरात काम करत होता. त्यामुळे त्याला या भागाची संपूर्ण माहिती होती. तो ठाण्यातील लेबर कॅम्पजवळील जंगलात लपून बसला होता. विजय दासने यापूर्वी मुंबईतील एका पबमध्ये काम केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विजयला अटक केल्यानंतर आज पोलीस त्याला न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर करणार आहेत. या कारवाईनंतर आज सकाळी ९ वाजता मुंबई पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील अपडेट देणार आहेत.
दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा आज चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई पोलीस ज्या प्रश्नांचा शोध घेत होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.
सैफ अली खानच्या घरात आरोपी कसा घुसला? आरोपींचा हेतू काय होता? या कामात त्याला साथ देणारा दुसरा कोणी आहे का? त्याने आणखी किती बॉलिवूड कलाकारांच्या घराची रेकी केली आहे? सैफच्या घरी जाण्याचा त्याचा उद्देश काय होता? त्याला कोणाला टार्गेट करायचा होते? ज्यांच्या मदतीने आरोपी सैफच्या घरी पोहोचला तो कोण आहे? असे अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. आज पोलीस चौकशीदरम्यान याप्रकरणाची उत्तर शोधणार आहेत.