बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांआधी त्याच्या राहत्या घरी मध्य रात्री चाकूने जीवघेणा हल्ला झाला. या घटनेने संपूर्ण बॉलीवूड हादरले असून सर्वच स्थरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान या प्रकरणावर बोलताना भाजप मंत्री नितेश राणे यांनी संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, सैफ अली खान हल्ला प्रकरणावर आधी एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय निरुपम आणि आता मंत्री नितेश राणे यांनी संशय व्यक्त केला आहे.तसेच सैफने स्वत:च चाकू मारुन घेतला की काय असा प्रश्न देखील पडतो असेही नितेश राणे म्हणाले. पुण्यातील आळंदी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
सैफ अली खानच्या घरात घुसलेले बांगलादेशी होते ,त्याच्यावर झालेला हल्ला मला संशयास्पद वाटतो. त्याने स्वत:चं चाकू मारून घेतला की काय असाही प्रश्न पडतो. पण खान, मलिक यांच्यावर हल्ले झाले तरच बारामतीच्या ताईला पुळका येतो. मात्र , सुशांत सिंगच्या आत्महत्येवर त्या गप्प असतात असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.
नितेश राणे म्हणाले, बांगलादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. आधी नाक्यावर उभे राहायचे आता घरात घुसायला लागले आहेत. जेव्हा सैफ रुग्णालयाबाहेर आला तेव्हा त्याला पाहून याला कोणीतरी चाकू मारला की हा असाच नाटक करुन बाहेर निघाला, असं मला वाटलं. शाहरुख खान, सैफ अली खान असेल तर सगळे लगेच टिवटिव करायला लागतात. पण जेव्हा हिंदू कलाकार किंवा सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंब्र्याचा जितू, बारामतीची ताई बाहेर नाही आली. बारामतीच्या ताईला बरोबर सैफ अली खानची, शाहरुखच्या मुलाची, नवाब मलिकची चिंता आहे. कधी कोणत्या हिंदू कलाकाराची चिंता करताना ऐकलय? यावर तुम्ही लक्ष ठेवा.
सर्व धर्म समभाव, भायचारा ही नाटकं फक्त हिंदूसाठीच आहे. सेक्युलर हा शब्द आपल्या संविधानात नाही. सेक्युलर शब्द हा फक्त काँग्रेसची नाटक आहेत. हे हिंदू राष्ट्र आहे, इथे फक्त आता हिंदूची हित पाहिली जाणार आहे. आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात आणि आम्ही सर्व धर्म समभाव असं का म्हणायचं? मंत्री ,आमदार आधी मी हिंदू आहे. आमच्या धर्माकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये, असे देखील नितेश राणे म्हणाले