बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली जोडी म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ. त्यांच्या लग्नानंतरही हे दोघे नेहमीच चर्चेत राहिले असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सध्या सोशल मीडियावर विकी-कॅटच्या बाळाबाबत चर्चा सुरु आहे. विकी आणि कॅटरिनाच्या बाळाची तीन महिन्यांनंतर पहिली झलक पाहायला मिळाली.
दोघांनी चिमुकल्या हाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या झलकेबरोबरच बाळाच्या नावाचाही उल्लेख होत असून त्या नावाचा अर्थ अतिशय सुंदर आहे. कतरिना आणि विकी यांनी आपल्या मुलाचे नाव ‘विहान कौशल’ ठेवले असून हे नाव विकी कौशलच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरलेल्या चित्रपटाशी जोडलेले आहे.
दोघांनी सोशल मीडियावर एक अतिशय गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना आणि विकी यांच्या बाळाचा छोटासा हात दिसत असून ही झलक पाहून चाहते देखील खूश झाले आहेत.हा फोटो शेअर करताना दोघांनी भावनिक कॅप्शन लिहिले, ‘आमचा आशेचा किरण. विहान कौशल. प्रार्थनांची दखल घेतली गेली. जीवन सुंदर आहे. आमचे जग एका क्षणात बदलले’ असं म्हटलं आहे.
अनेक चाहत्यांनी या नावामागील अर्थ आणि भावना समजून घेत दोघांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. खूप कमी लोकांना माहीत असेल की, ‘विहान’ हे नाव विकी कौशलच्या सुपरहिट चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’शी जोडलेले आहे. या चित्रपटात विकी कौशलने मेजर विहान सिंग शेरगिल ही भूमिका साकारली होती.
विकी आणि कतरिनाने मुलाच्या नावामागचा किस्सा सांगितला नसला तरीही चाहत्यांनी मात्र त्याचे खास कनेक्शन शोधून काढले आहे. विकी कौशलच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट म्हणजे 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'. या चित्रपटात विकीने मेजर विहान सिंह शेरगिल ही मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यामुळे आपल्या आयुष्यातील गाजलेल्या भूमिकेचे नाव विकीने आपल्या मुलाला दिले असावे, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.
‘उरी’ पूर्वी विकीने ‘मसान’, ‘राजी’, ‘संजू’ सारख्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या होत्या. मात्र ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मधील मुख्य भूमिकेमुळे त्याला खरी ओळख आणि सुपरस्टारडम मिळाले. त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षक देखील प्रचंड खूश झाले होते. याच चित्रपटामुळे विकीच्या करिअरला नवे वळण मिळाले आणि त्यामुळेच हा चित्रपट आणि ‘विहान’ हे नाव त्यांच्या आयुष्यासाठी लकी मानले जात असल्याची चर्चा आहे.