सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2: द रुल’ हा ॲक्शन ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतोय. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चार दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे.
या चित्रपटाने भारतात अवघ्या चार दिवसात तब्बल 529.45 कोटी रुपयांचा तर जगभरात 800 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. रविवारीही या चित्रपटाची जबरदस्त कमाई झाली. ‘पुष्पा 2’ने रविवारी भारतात 141.50 कोटी रुपयांची कमाई केली.
5 डिसेंबर रोजी हा चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. मूळ तेलुगू भाषेत असलेल्या या चित्रपटाने हिंदीतही अभूतपूर्व पैसा कमावला आहे. ‘पुष्पा 2’ने चार दिवसांत हिंदी भाषेत 285.7 कोटी रुपये तर तेलुगू भाषेत 198.55 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे या दाक्षिणात्य चित्रपटाची क्रेझ संपूर्ण भारतातही खूप असल्याचं सहज स्पष्ट होतंय.
‘पुष्पा 2’ची चार दिवसांतील कमाई
पहिला दिवस- 164.25 कोटी रुपये दुसरा दिवस- 93.8 कोटी रुपये तिसरा दिवस- 119.25 कोटी रुपये चौथा दिवस- 141.5 कोटी रुपये चार दिवसांची कमाई- 529.45 कोटी रुपये
पहिल्या चार दिवसांची कमाई पाहता ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व निर्माण केलंय.
‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं असून 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका होत्या.
आता सीक्वेलमध्येही त्यांच्याच मुख्य भूमिका आहेत. या सीक्वेलचा बजेट तब्बल 300 कोटी असल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून त्याला आतापर्यंत 1 कोटीपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.