माझी तुझी रेशीमगाठ'नंतर प्रार्थना-मायरा पुन्हा सज्ज! ३ जुलैला रिलीज होणार 'मर्दिनी'; पाहा आईच्या सामर्थ्याची जबरदस्त झलक
माझी तुझी रेशीमगाठ'नंतर प्रार्थना-मायरा पुन्हा सज्ज! ३ जुलैला रिलीज होणार 'मर्दिनी'; पाहा आईच्या सामर्थ्याची जबरदस्त झलक
img
नितीशा कुलकर्णी




'माझी तुझी रेशीमगाठ' या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली नेहा आणि परीची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. पण यावेळी हा आनंद छोट्या पडद्यावर नाही, तर मोठ्या पडद्यावर द्विगुणित होणार आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि बालकलाकार मायरा वायकुळ आता 'मर्दिनी' या नव्या चित्रपटातून एका थरारक आणि भावनिक प्रवासासाठी एकत्र आल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या निमित्तानं छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मायरा आणि प्रार्थना यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

प्रार्थना आणि मायरा नव्या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी आईचा म्हणजे प्रार्थनाचा थरारक अंदाज पाहायला मिळणार आहे.  'मर्दिनी' हा नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे.  नारीशक्ती, संघर्ष, आत्मसन्मान आणि आईच्या सामर्थ्याची कथा मांडणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा 3 जुलै 2026 रोजी रिलीज होणार आहे. "आई तारी तिला कोण मारी" म्हणजेच लेकरांसाठी आई ज्योतही पेटवते आणि राक्षसांसाठी चिताही... हे कॅप्शन चित्रपटाच्या आशयाची प्रभावी झलक देतं.

आई ही फक्त प्रेम, माया आणि जपणुकीची प्रतिमा नसते, तर आपल्या लेकरांवर संकट आलं की ती कठोर आणि निर्भय रूप धारण करून त्यांचं रक्षण करण्यासाठी उभी राहते, ही भावना या कथानकातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे. चित्रपटात एका आईचा संघर्ष, तिच्या कुटुंबासाठीची झुंज आणि परिस्थितीसमोर न झुकणारी तिची जिद्द यांचा भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे. आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक सामान्य स्त्री कशी परिस्थितीशी दोन हात करते आणि वेळ आली तर 'मर्दिनी' सारखं सामर्थ्यवान रूप धारण करते, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा ठरणार आहे. चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक प्रभावीपणा मिळणार असून, बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेत भावनिक पैलू जोडणारी ठरणार आहे. कलाकारांची निवड आणि विषयाची ताकद यामुळे ‘मर्दिनी’बद्दलची उत्सुकता अधिक वाढत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group