दैनिक भ्रमर : आज १५ ऑगस्ट रोजी, देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी, तुम्ही तुमच्या कुटुंबासह घरी बसून हिंदी सिनेइंडस्ट्रीने बनवलेल्या या सर्वोत्तम देशभक्तीपर चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. जे यू ट्यूब, नेटफ्लिक्स, झी5, अॅमेझॉन प्राइम जिओ सिनेमावर उपलब्ध आहेत.
जेपी दत्ता दिग्दर्शित 'बॉर्डर' या चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारा आहे. या चित्रपटाप्रमाणे त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. बॉर्डर सिनेमा १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे. हा सिनेमा म्हणजे एक माईलस्टोन होता. त्यावेळेस बॉर्डर सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. हा चित्रपट तुम्हाला अॅमेझॉन प्राइमवर पाहायला मिळेल
विकी कौशलचा 'उरी' हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भारतीय सैनिकांचे धाडस आणि शौर्य जबरदस्त पद्धतीने पडद्यावर सादर करण्यात आले आहे. २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून भारतीय सैन्याने दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. हा चित्रपट तुम्हाला झी5 वर पाहायला मिळेल.
सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत 'शेरशाह' चित्रपटाची कथा कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
'सॅम बहादूर' हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या आयुष्याची ४० वर्षे दिली. हा चित्रपट दिग्गज लष्करी अधिकाऱ्याच्या जीवनाची झलक दाखवतो. विकी कौशल स्टारर हा चित्रपट झी५ वर उपलब्ध आहे.
आलिया भटच्या 'राझी' चे खूप कौतुक झाले. या चित्रपटात तिने तिच्या दमदार अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. सेहमत खानच्या भूमिकेत आलिया भटने या सस्पेन्स अॅक्शन थ्रिलरद्वारे प्रेक्षकांच्या मनावर देशभक्तीची भावना भरली. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
'फायटर' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे. हा ब्लॉकबस्टर चित्रपट तुम्ही घरी बसून नेटफ्लिक्सवर पाहू शकता
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेजर' चित्रपट मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनाचे चित्रण करतो, जे २६/११ च्या हल्ल्यात मुंबईतील ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवताना शहीद झाले होते. तुम्ही हा चित्रपट तुमच्या कुटुंबासह नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'मिशन मजनू'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्याने एका रॉ एजंटची भूमिका साकारली होती जो पाकिस्तानच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा शोध घेण्यासाठी गुप्त मोहिमेवर पाकिस्तानला जातो. तुम्ही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.