जगभरात दररोज चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र, काही चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांच्या मनात थेट घर करतात. हेच चित्रपट जेव्हा ऑस्कर अवार्डसाठी नामांकित होतात किंवा चित्रपटांना ऑस्कर मिळतो तेव्हा चित्रपटाचे महत्त्व अधिकच वाढते. ऑल अबाउट ईव्ह’, ‘टायटॅनिक’ आणि ‘ला ला लँड’ या चित्रपटांच्या नावावर 14-14 नामांकनांचा विक्रम होता. आता हा विक्रम एका हॉरर चित्रपटाने मोडला आहे.
हॉलीवूडमधील हॉरर चित्रपटांना सहसा ऑस्करमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नाही. मात्र, यंदा हे धोरण बदलताना दिसत आहे. ‘सिनर्स’ हा हॉलीवूड हॉरर चित्रपट सध्या ऑस्करच्या शर्यतीत सर्वात पुढे असून, 98व्या अकादमी अवॉर्डसाठी तब्बल १६ नामांकने मिळवत या चित्रपटाने इतिहास रचला आहे.या चित्रपटाने 3255 कोटी रुपयांची कमाई केलीय.
प्रसिद्ध दिग्दर्शक रायन कूगलर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला बेस्ट डायरेक्शन, बेस्ट स्क्रीनप्ले यांसह अनेक महत्त्वाच्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.‘सिनर्स’ला फक्त अभिनय आणि दिग्दर्शनापुरते मर्यादित न ठेवता, तांत्रिक विभागातही मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली आहे. सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स, साउंड प्रोडक्शन, प्रॉडक्शन डिझाइन, एडिटिंग, कास्टिंग, कॉस्च्युम डिझाइन, म्युझिक आणि स्कोअर, मेकअप आणि हेअर स्टाइल श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.‘
अनेकदा हॉरर चित्रपटांना ऑस्करमध्ये दुर्लक्षित केलं जातं. मात्र, गेल्या वर्षी ‘द सब्स्टन्स’ आणि यंदा ‘सिनर्स’ला मिळालेल्या नामांकनांमुळे ही मानसिकता बदलताना दिसत आहे.