नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिन व आगामी सण उत्सव यांच्या अनुषंगाने नाशिकरोड रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी आज श्वान पथकासह विविध ठिकाणी तपासणी केली.
रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, रेल्वे पोलीस बलाचे प्रमुख वरिष्ठ निरीक्षक हरफुल सिंह यादव, स्टेशन मास्तर मनोज श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
गुरुवारी स्वातंत्र्य दिन आहे. तसेच आगामी काळात गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव, नवरात्र उत्सव येत आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानकात घातपात होऊ नये म्हणून रेल्वे सुरक्षा बलाच्या श्वान पथकाच्या मदतीने तिकीट विक्री केंद्र, पार्सल विभाग, सर्व प्लॅटफॉर्म, रेल्वे गाड्या आदी भागात तपासणी सुरू आहे.
रेल्वे पोलीस ठाणे अंमलदार, रेल्वे सुरक्षा बल अमंलदार व मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे श्वान पथक यांच्या मदतीने नाशिकरोड प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 4, प्रवासी गाडया, पार्सल ऑफीस, बुकींग परिसर, कचरा कुंडी व अडगळीच्या जागेवर घातपात तपासणी करण्यात आली. स्वातंत्र्य दिना निमीत्त बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.