तृषा कृष्णनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला थलापती विजय म्हणाला, माझ्या...
तृषा कृष्णनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला थलापती विजय म्हणाला, माझ्या...
img
वैष्णवी सांगळे
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपथी विजय सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील मोठ्या संकटांचा सामना करत आहेत. एकीकडे त्यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जन नायकन’ सेन्सॉरशिपच्या अडचणींमुळे रखडला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही मोठी खळबळ उडाली आहे.

विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोरनालिंगम यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. लग्नाच्या तब्बल २७ वर्षांनंतर संगीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून त्यांनी विजयवर विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी पतीच्या चेन्नईतील घरात राहण्याची परवानगीही मागितली आहे.

वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील संकट असतानाच गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर अभिनेत्री तृषा कृष्णन आणि विजय यांच्या अफेअरच्या वावड्या उठत आहेत. एका लग्नसमारंभात हे दोघे एकत्र दिसल्याने या अफवांना अधिक हवा मिळाली. विरोधकांनी या मुद्द्यावरून विजयला घेरण्याची संधी सोडली नाही.

दरम्यान, विजयने या सर्व मुद्द्यांवरून विरोधकांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत विजय म्हणाला, "माझा आवाज दाबण्यासाठी 'जन नायकन' अडवण्याचा प्रयत्न झाला, माझ्या वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक केली गेली. पण लक्षात ठेवा, अशा वैयक्तिक हल्ल्यांनी माझा आत्मविश्वास डळमळीत होणार नाही. जेवढा मला त्रास दिला जाईल, तेवढा माझा जनसेवेचा निर्धार अधिक पक्का होईल."

सध्या सोशल मीडियावर विजयच्या या जळजळीत भाषणाची चर्चा रंगली आहे. काहींनी विजयचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्याच्या भाषणावरून त्याला सुनावलं आहे. विजयच्या आयुष्यातील वाद हे विरोधकांचे षड्यंत्र नसून त्याच्या स्वतःच्या निर्णयांचे फळ आहेत. तृषासोबत जाहीर कार्यक्रमात दिसणं हा त्याचा स्वतःचा निर्णय होता, त्यात राजकारण कुठे आलं? असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

निवडणुकीला आता काहीच आठवडे शिल्लक आहेत. विजयवर लादण्यात आलेले नियम (SOP) आणि सिनेमावरची बंदी यामुळे त्याच्या प्रचारात अडथळे येत असले, तरी त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्याच्या प्रचाराला होणारी गर्दी पाहता, याचा निवडणुकीच्या निकालांवर कितपत प्रभाव पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group