विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून सर्वच इच्छुकांनी सेटिंग लावण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला आहे. काही इच्छुकांनी तर आपल्याला पक्षात तिकीट मिळणार नाही याचा अंदाज घेऊन दुसऱ्या पक्षात जाण्यास सुरुवात केली आहे. असं असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हिनेही राजकारणात येण्याचे संकेत देऊन बार उडवून टाकला आहे.

अभिनेत्री मानसी नाईक परभणीत आली होती. भाजपच्या दहीहंडी फोड स्पर्धेसाठी मानसी नाईक आली होती. यावेळी तिला राजकारणात येणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी येस, हो… असं उत्तर दिलं. मलाही भविष्यात राजकारणात यायला आवडेल, असं मानसीने सांगितलं. पण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवलं आहे. त्यामुळे तरुणाईच्या काळजाची धडकन असलेली मानसी नाईक कोणत्या पक्षातून लढणार? कोणत्या मतदारसंघातून लढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.