विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात सभा घेतली. त्याच राधानगरी विधानसभा मतदारसंघात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही तोफ धडाडणार आहे.
विधानसभा निवडणूक कालावधीतील पहिली आणि कोल्हापुरातील एकमेव राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघात आदमापूर येथे ठाकरे यांची सभा झाली होती. त्याच शेजारील गावात सरवडे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मेळावा होणार आहे.
याच मतदारसंघातून सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे ठाकरेंचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांचा पराभव करून विजयी झाले होते. त्यांच्याच बालेकिल्ल्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? c
विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिलीच आणि कोल्हापुरातील एकमेव सभा ही राधानगरी विधानसभा मतदारसंघात झाली होती. सभेवेळी ठाकरे हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर तुटून पडले होते. गद्दारांना गाडा. त्यांना उखडून टाका. त्यांना धडा शिकवा. गद्दारांसोबत गेलेला तुमच्याच मतदारसंघातील आमदार आहे.
त्यांचा देखील निकाल लावा. या शब्दात ठाकरे शिंदेंच्या आमदारांसह शिंदेंवर बरसले होते. मात्र निवडणुकीच्या निकालात शिंदेंचे उमेदवार आमदार प्रकाश अबीटकर विजयी झाले.
तर तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मतदारसंघात सभा घेत मतदारांना आबिटकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. तुम्ही आमदार करा मी नामदार करून पाठवतो, अशा शब्दांत शिंदे यांनी मतदारसंघातील मतदारांना शब्द दिला होता.
त्यानंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री शिंदे हे राधानगरी मतदार संघात येत आहेत. सरवडे येथे त्यांचा आभार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे मतदारसंघातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.