उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. देशमुख हे वरळीत राहत होते. गेल्या दहा वर्षांपासून अजित पवारांकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते.
संजय देशमुख यांच्या जाण्याने राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. संजय देशमुख यांच्या पार्थिवावर सोमवारी म्हणजे उद्या साडेआठ वाजचा मुंबईच्या दादरमध्ये अंत्यविधी होणार आहे.
संजय देशमुख यांच्या निधनामुळे अजित पवार यांनीही सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले आहे. 'मागील दहा वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारे संजय देशमुख यांच्या निधनाने अतीव दु:ख झालं आहे. त्यांच्या जाण्याने समपर्क आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी गमावलाय. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी आणि माझे कुटुंबीय सहभागी आहोत, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
संजय देशमुख हे पत्रकारांच्या वर्तुळात अनेकांना परिचित होते. त्यांनी याआधी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेही ओएसडी म्हणूनही काम केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करत असताना ते कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले.
संजय देशमुख हे सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावचे सुपुत्र होते. संजय देशमुख यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. देशमुख हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जावई होते. त्यांचं पार्थिव दादरच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलंय. संजय देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी साडेआठ वाजचा दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.