मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला थेट समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे. वैजापूरमध्ये रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. “महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय केलं, आणि आम्ही काय केलं. याची खुली चर्चा करायला मी तयार आहे. मात्र, विरोधक हे आव्हान स्वीकारायला नाही. कारण त्यांनी अडीच वर्षांत काहीही केलं नाही”, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं. “महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांत अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती दिली. राज्यात अडीच वर्ष स्थगिती सरकार होतं. त्यावेळी मंदिरं इतर प्रार्थनास्थळेही बंद केली होती. मात्र, महायुतीचं सरकार आलं आणि आपण राज्यातील सगळी मंदिरं उघडली. तसेच स्थगिती मिळालेल्या सगळ्या योजना पुन्हा सुरु केल्या”, असे ते म्हणाले.
दरम्यान “महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण सीनेमा अजून यायचा बाकी आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० वरून २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शेतकरी सन्मान योजनेचा निधीदेखील वाढवला आहे. प्रत्येकाच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत”, असेही त्यांनी सांगितलं.