सोलापुरमध्ये जावयाने सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून जावयाने सासू, सासरे आणि मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने तिघांवार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे गावातील ही घटना आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात जावयाने सासऱ्याची चाकूने भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रामहिंगणे गावात ही घटना घडली. कौटुंबिक वादातून जावयाने सासू, सासरे आणि मेव्हणा यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा मृत्यू झाला. तर सासू आणि मेव्हण्यावर सोलापुरात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं ?
गेल्या अडीच वर्षांपासून पत्नीला नांदवायला पाठवत नाही आणि कोर्टात पोटगीसाठी दावा केल्यामुळे जावई मंगेश सलगर हा प्रचंड संतापला. याच रागातून त्याने २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता चाकूने सासू, सासरे आणि मेहुण्यावर हल्ला केला. सासू, सासरे आणि मेहुण्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी मंगेश सलगरने ११२ नंबरवर कॉल करून पाच ते सहा जण आम्हाला मारत असल्याची तक्रार केली होती.
सासू, सासरे आणि मेहुण्यावर हल्ला करून मंगेशने स्वतःलाच देखील चाकूने वार केले होते. हा हल्ला बाहेरून आलेल्या ५ ते ६ जणांनी केल्याचे त्याला भासवायचे होते. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बापूराव तुळशीराम मासाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर बापूराव यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
बापूराव यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण मासाळ याचे ६ मे रोजी लग्न होणार होते. पण लग्नाच्या १० दिवस आधीच ही दुर्दैवी घटना घडली. मोहोळ पोलिस ठाण्यात मंगेश सलगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.