सुखी संसाराचं स्वप्न क्षणात तुटलं ! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे नववधूचा धक्कादायक मृत्यू ; कुठे घडली घटना?
सुखी संसाराचं स्वप्न क्षणात तुटलं ! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे नववधूचा धक्कादायक मृत्यू ; कुठे घडली घटना?
img
DB
सोलापूर : लग्नगाठ बांधून सुखी संसाराची स्वप्न नवदाम्पत्य पाहत असतात. मात्र, अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला देवाज्ञा झाल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडला.

माळशिरस तालुक्यातील पराडे आणि गळगुंडे हे दोन्ही कुटुंब लग्न सोहळ्याच्या आनंदात होते. पण लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधुला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राणज्योत मालवली. जानकी असं मृत्युमुखी पडलेल्या नववधूचं नाव आहे.

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार, समीर हरिदास पराडे याचा १३ मे रोजी घोटी (ता. माढा ) येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे हिच्याशी निरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात विवाह सोहळा संपन्न झाला होता. लग्नानंतर नववधू सासरी आली. आता हेच आपलं विश्व म्हणत या नववधूने सुखी संसाराची स्वप्नेही रंगवली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक जानकीच्या छातीत कळा येऊ लागल्या.

हा प्रकार लक्षात येताच कुटुंबातील लोक तिला तात्काळ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल घेऊन निघाले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच नववधू जानकीवर काळाने घाला घातला आणि संसार फुलण्यापूर्वीच काळाची दृष्ट लागली.

दरम्यान, पराडे कुटुंबातील सून व गळगुंडे कुटुंबाची लेक असलेल्या जानकीच्या अचानक झालेल्या मृत्युने दोन्ही कुटुंबांच्या आनंदावर विरझण पडले असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नववधू जानकी हिच्यावर माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group