नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : वडनेर दुमाला येथे बालक आयुष भगत याचा जीव घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने मोठी मोहीम उभारली आहे. शिवसेना (ठाकरे गट) व ग्रामस्थांच्या तीव्र इशाऱ्यानंतर वन विभागाने 12 पिंजरे, दोन थर्मल ड्रोन, कॅमेरे आणि अधिकारी-कर्मचारी यांची मोठी फौज तैनात करून जेरबंद मोहिमेला वेग दिला आहे.
माजी नगरसेवक केशव पोरजे व योगेश गाडेकर यांनी आयुष भगत हत्याकांडानंतर वन विभागाला इशारा देत म्हटले होते की, बिबट्याला तात्काळ जेरबंद केले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आक्रमक इशाऱ्याचा वन विभागाने चांगलाच विचार करून गावात मोठ्या प्रमाणावर पिंजरे आणि तांत्रिक साधनांची उभारणी केली आहे.
सात दिवसांपासून घटनेच्या ठिकाणी तीन पिंजरे व कॅमेरे बसवण्यात आले होते, मात्र अद्यापही नरभक्षक बिबट्या सापळ्यात सापडलेला नाही. त्यामुळे आता पिंजर्यांची संख्या वाढवून ड्रोनसह शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या शोकसभेत दिलेल्या इशाऱ्याचा परिणाम म्हणूनच ही व्यापक कारवाई सुरू झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.