ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान ठाकरे गट आणि मनसेच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 17 मधून शिंदे गटाचे मनोज शिंदे यांच्याविरोधात रिंगणात असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
तर दुसरीकडे ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 मधील मनसेचे उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्जही बाद ठरवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना मला कागदपत्रं राहिल्याचे सांगण्यात आले. ती कागदपत्रं वेळेत देऊनही पोलिसांनी आम्हाला आत सोडण्यास नकार दिला. काहीवेळाने पोलिसांनी आम्हाला आतमध्ये सोडले तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचं काहीही ऐकून न घेता उमेदवारी अर्जाची छाननी केली आणि कागदपत्र नसल्याचे कारण देत आमचा अर्ज अवैध ठरवला. जेव्हा आम्ही यावर हरकत घेतली तेव्हा आम्हाला तुम्ही वेळेत न आल्याचं कारण सांगण्यात आले, असे मनसेच्या प्राची घाडगे यांनी सांगितले.
निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी पक्षपातीपणे अन्यायकारकरित्या अर्ज अवैध ठरवले, असा आरोप मनसेसह अन्य उमेदवारांनी केला आहेत. याविरोधात आज (गुरुवारी) संबधित निवडणुक कार्यालयात मनसे नेते अविनाश जाधव हे अर्ज बाद झालेल्या उमेदवारांसमवेत आमरण उपोषणाला बसणार आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेसह सर्वच इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. ठाण्यात मनसेकडून एकुण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी संबंधित निवडणुक कार्यालयामध्ये पार पडली. वागळे इस्टेट प्रभाग क्रमांक १६, १७ व १८ या प्रभागांमधील उमेदवारी अर्जाची छाननी निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचे अर्ज गंभीर त्रुटी असून देखील बाद केले नाहीत. मात्र, मनसेसह विरोधी पक्षातील आणि काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले आहेत. वृषाली पाटील ह्या अधिकाऱ्याची ही वर्तणुक अन्यायकारक आणि पक्षपाती दिसून आल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.