ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सराफा शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश जैन (55) असे तक्रारदार सराफाचे नाव आहे. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर सूड भावनेने आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले.
सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी वैभव ठक्कर याला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी मनसे नेते अविनाश जाधव त्यांचे सहकारी, अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप करत पोलीसात तक्रार दाखल केली.
सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम 385, 143, 147, 323, 120ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.