नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, विरोधकांकडून त्यांच्या कार्यशैलीवर तीव्र टीका सुरू झाली आहे. आज सकाळी नाशिक रोड येथील अनुराधा चौकात त्यांच्या ताफ्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकरोड मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जात होते. त्याचवेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत कृषी मंत्री कोकाटे यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न करून वातावरण तापवले.
या निषेधात्मक कृतीत शिवसेना (ठाकरे गट) चे उपजिल्हाप्रमुख भैया मणियार, तसेच शिवसैनिक योगेश देशमुख आणि निलेश शिरसाठ यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप घेऊन या तिघांनाही ताब्यात घेतले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही, मात्र रमी खेळायला वेळ आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना पत्ते खेळण्यासाठी आमंत्रित करण्याचा हा मार्ग निवडला.
दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांचा निषेध नोंदवण्याचा हा अनोखा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.