नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासारखे काही घडलेच नसल्यामुळे तो देण्याचा प्रश्नच नाही, असे राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्या रामेती येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. कोकाटे म्हणाले की, माझ्याबद्दल षडयंत्र रचले जात आहे. त्याचा मीडिया मार्फत विपर्यास केला जात असून आपण मंत्रालयात ऑनलाइन रमी खेळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तर स्वतः राज्यपालांकडे राजीनामा देईन
मोबाईलद्वारे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ काढणारे व माझ्याबद्दल बदनामी करणार्यांना मी वकिलामार्फत लवकरच नोटीस देणार असून या सर्व प्रकरणी संबंधितांवर अब्रू नुकसानीचा दावाही दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. मंत्रालयातील त्या व्हिडीओची सखोल चौकशी व्हावी व दोषी असल्यास नागपूरच्या अधिवेशनात मी स्वतः राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन असे अॅड. माणिकराव कोकाटे म्हणाले. चौकशीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.
बदनामी करण्याऐवजी पुरावे द्या
काही विरोधक आणि मीडियाद्वारे माझी बदनामी केली जात असून तेच तेच दाखवून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. नुसते आरोप करत बदनामी करण्याऐवजी पुरावे द्या. मात्र पुरावे नसताना असे आरोप करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. मंत्रालयात कोण कोणाशी बोलतात याचे ब्रिफ चेक करावे, त्यातून सत्यता व नेमके काय ते बाहेर पडेल असे सांगून अॅड. कोकाटे म्हणाले की, हे सर्व आरोप बिनबुडाचे असून माझ्याविरुद्ध कट कारस्थान रचणार्या सर्वांना मी कोर्टात खेचणार आहे. त्यापूर्वी या सर्व घटनाक्रमांची बारकाईने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
राजीनामा देण्यासारखं घडलं काय ?
राजीनामा देण्यासारखं घडलं काय. मी काही विनयभंग केला आहे, चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केले काय? असा सवाल कोकाटेंनी उपस्थित केला. ज्या विरोधकाने तो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्याला असेल, गांजा ओढला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात.
मला रमी खेळता येत नाही, स्किप करेपर्यंत दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला
ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचे अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारच्या गेमसाठी माझा कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट अटॅच नाही. माझे बँकेचे स्टेटमेंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. अँड्राईड मोबाईल आहे , 5 जी आहे. कोणतेही अॅप ओपन केले तर वारंवार पॉपअप येतात. स्किप करेपर्यंत माझा दहा पंधरा सेकंदाचा वेळ जातो. हाऊसमध्ये त्यादिवशी माझी लक्षवेधी होती. त्यासाठी ओएसडीकडून माहिती मागविण्यासाठी मी मोबाईल उघडला असता ते पॉपअप आले, असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
चौकशीची मागणी करणार
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. चौकशी करण्याची मागणी करणार आहे. हा इतका छोटा विषय आहे, तो ऐवढा का लांबतो आहे, हे समजत नाही. महाराष्ट्रात माझी मोठ्या प्रमाणात बदनामी सुरू आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समृद्धी कृषी योजनेची घोषणा त्यांनी यावेळी केली.