नाशिक :- भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा आज नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे हा उद्योग सुरू होता.
आज सकाळी सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील दूध संकलन केंद्रामध्ये काही इसम 2 किटल्यांमधून पांढऱ्या रंगाचे द्रव दुधामध्ये मिसळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने मिरगाव येथील ओम सद्गुरू दूध संकलन केंद्र येथे छापा टाकला.
या ठिकाणी डेअरी चालक संतोष विठ्ठल हिंगे व प्रकाश विठ्ठल हिंगे हे त्यांच्या दूध संकलन केंद्रात संकलित झालेल्या दुधामध्ये पांढरे द्रव मिश्रण करताना मिळून आले. तेथे मिलकी मिस्ट नावाची रासायनिक पावडर व कपडे धुण्याचा कास्टिक सोडा हिंगेच्या घराची झडती घेतली असता मिळून आला. याशिवाय त्याच्या घरात कास्टिक सोडा व मिलकी मिस्ट पावडरचा साठा मिळून आला.
हिंगे यास या पावडरचा पुरवठा करणाऱ्या हेमंत श्रीहरी पवार (रा. उजनी, ता. सिन्नर) यास ताब्यात घेऊन त्याच्या गोडाऊनची झडती घेतली असता 300 गोण्या मिलकी मिस्ट, 7 गोण्या कास्टिंग सोडा असा एकूण 11 लाख रुपयांचा साठा आढळून आला. त्यांच्या विरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.