रोहित पवारांना कोर्टाचा दणका;  माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणात नाशिक न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश
रोहित पवारांना कोर्टाचा दणका; माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणात नाशिक न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश
img
वैष्णवी सांगळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात न्यायालयाने रोहित पवार यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

काही महिन्यांपूर्वी रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विट केला होता. यावरून कोकाटे यांनी पवारांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत कोकाटे यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. 

या अहवालाची दखल घेत न्यायालयाने आता रोहित पवार यांना येत्या ९ तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, रोहित पवार आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, याआधी झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात जबाब मांडताना म्हटले होते की, माझ्या मोबाईलवर 'जंगली रमी' ची जाहिरात आली होती, ती बंद करताना १५ ते २० मिनिटे लागली. त्याच दरम्यानचा व्हिडिओ काढून आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. मी विधान परिषदेमध्ये स्पष्ट स्पष्टीकरण दिले. त्यानंतरही रोहित पवार यांनी ट्विट करत बदनामी केली. या प्रकारामुळे मला कृषी खात्याचे मंत्रिपद गमवावे लागले, पक्ष आणि वैयक्तिक प्रतिमेला मोठा धक्का बसला. व्हिडिओ कोणी आणि कसा काढला, याची चौकशी व्हावी. कारण, रोहित पवार हे विधान परिषद सदस्य नाहीत, तरीही त्यांच्याकडे व्हिडिओ कसा पोहोचला, हे महत्त्वाचे आहे, असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला होता. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group