"त्या" घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या महाराष्ट्र सरकार....
img
Dipali Ghadwaje
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात आणि ड्रग्जप्रकरणावरुन पुणे शहर टार्गेटवर असताना, एका महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

पुण्यातील या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून गृहमंत्री आणि पालमंत्र्यांना प्रश्न विचारले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे ही क्राइम कॅपिटल होत असल्याचं म्हटलं.  

राज्यात आज अतिशय गंभीर परिस्थिती असून पुण्यात सातत्याने क्राईम वाढत आहे. मी आरोप करत नाही हा डेटा सांगतो आहे, हा केंद्र सरकारचा डेटा असेल. महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे, अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे आहे. आधी नागपूर क्राईम कॅपिटल होते आता पुणे होत आहे, अशा शब्दात पुण्यातील गुन्हेगारीवरुन सुप्रिया सुळेंनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांना लक्ष्य केलं.

महाराष्ट्र सरकार काय करते? महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात? सातत्याने हे सुरू आहे. या राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. 200 आमदारांचे सरकार आहे, पण तुमच्या आणि माझ्या पदरात काय पडले, विकास कोणाचा केला या सरकारने ? महाराष्ट्राचा आज देशात नंबर खाली जायला लागला आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. 

पुण्यात नेमकं काय घडलं
वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वाहतूक विभागाच्या विश्रामबाग कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. बुधवार चौकात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू असताना हा प्रकार घडला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group