निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. नुकतेच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळविस्तारावरून राज्यात चांगलीच रणधुमाळी रंगलेली आहे. अशातच आता भाजप आमदार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला पेव फुटले आहे.
आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार मंत्रिपदासाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत. ते अजित पवारांच्या बाजुला असतील असा दावा नितेश राणेंनी केलाय. त्यामुळे राज्यात आता पुन्हा वातावरण तापलेलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली आगे. लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितलं. त्यामुळे संजय राऊत आणि विनायक राऊत यांना मिरच्या झोबल्या. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो, असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमचा कोकणी माणूस कधीही कोणाजवळ कर्ज मागत नाही. घेतलेले कर्ज त्वरित फेडतो, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंना कोकणातील जनता समजली नाही. उद्धव ठाकरेंच्या विकास विरुद्धप्रवृत्तीला जनतेने नाकारले. सामान्य मतदारांचा अपमान करण्याचे काम केलं जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. वायकरांवरून बोलताना नितेश राणेंना उद्धव ठाकरेंना पारदर्शक निकाल समजला नसल्याचं म्हटलं आहे. जिथे विरोधकांचे उमेदवार निवडूण आलेत तिथेही ईव्हीएम हॅक झालं असं म्हणायचं का? असा खोचक सवाल देखील नितेश राणेंनी केला आहे.
दरम्यान आता नितेश राणे यांनी रोहित पवारांबद्दल केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. येणाऱ्या काळात हे चित्र स्पष्ट होणार आहे.