नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किशोर दराडे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने महेंद्र भावसारयांना उमेदवारी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेत संभ्रम आहे. संभ्रम दूर झाला नाही तर आगामी निवडणुकीत वाईट परिस्थिती उद्भवू शकते, असे खडेबोलच महायुतीला सुनावले आहे.
दरम्यान या बैठकीनंतर माणिकराव कोकाटे पत्रकारांशी संवाद साधताना नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, मला कुठलाही निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेला नाही. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून निरोप आल्याने मी या बैठकीस उपस्थित होतो. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता सुरु झाली आहे. महायुतीकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली असेल तर त्यांचा प्रचार करावा यावर सर्वांचे एकमत झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी उमेदवार दिला असेल तर त्यांचे काम करावे लागेल
यात अडचण एकच आहे की, शिक्षक मतदार आहेत. ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे शिक्षण संस्थांची निगडीत असणाऱ्यांचा शिक्षकांशी अधिक संबंध असतो. त्यामुळे ज्यांच्या संस्था आहेत. त्यांनी या निवडणुकीत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच मतदारसंघात प्रचार करताना संपर्कातील जेवढे शिक्षक मतदार आहेत. त्यांना पक्षाच्या पाठीमागे उभे करणे हे आमचे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी उमेदवार दिला असेल तर आम्हाला त्यांचे काम करावे लागेल.
अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना एबी फॉर्म दिला आहे, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, कोण हे? आमच्या पक्षाचा उमेदवार असेल तर आम्ही पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार. जर आमच्या पक्षाने माघार घेतली नसेल आणि आम्हाला अजितदादांनी आदेश दिला तर अजित दादा जे सांगितल तेच काम करणार, असे त्यांनी म्हटले आहे.