
सिन्नर :- येथील उद्योग भवन परिसरातील प्रकाश नगरमध्ये अभ्यासासाठी भाड्याने रुम घेऊन राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला सहा आरोपींनी घरात घुसून बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवून त्याचे अपहरण केले होते.
त्यानंतर आरोपींनी मुलाच्या कुटुंबियांकडे 20 लाखांची खंडणी मागून मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकारही समोर आला. मात्र, सिन्नर पोलिसांनी तपासचक्र फिरवत अवघ्या सहा तासांत दोन आरोपींना जेरबंद करत त्यांना त्याच्या ताब्यातून अपहरण केलेल्या मुलाची सुटका केली आहे.
अर्जुन जोगींदर गुप्ता (17) व त्याचा गावाकडील मित्र करण चक्रधारी यांनी प्रकाश नगरमध्ये अभ्यासासाठी रुम भाड्याने घेतली होती. सोमवारी (दि.27) रात्री 11 वाजेच्या सुमारास सहा आरोपींनी त्यांच्या रुममध्ये घुसुन दोघांना बंदुकीचा व चाकुचा धाक दाखवत मारहाण करण्यास सुरुवात केली.
करण व अर्जुनचे हातपाय बांधुन त्यांच्या तोंडास चिकट टेप गुंडाळला. आरोपींनी करणला रुममधील बाथरुममध्ये कोंडुन अर्जुनला तेथून पळवून नेले. त्यानंतर आरोपींनी अर्जुनच्या मोबाईलवरुन त्याच्या मोठ्या भावास फोन करुन तुझ्या भावाला आम्ही कीडनॅप केले असल्याचे सांगत 20 लाखांची मागणी केली. पैसे द्या नाहीतर तुझ्या भावाला मारुन टाकु अशी धमकी दिली.
अर्जूनच्या कुटुंबियांनी याबाबत तात्काळ सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती कळवताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावुन खात्री केली. त्यावेळी तेथे अर्जूनचा मित्र करण या बाथरुममध्ये आढळून आला. त्याच्याकडून सर्व हकिकत ऐकल्यानंतर पोलिस निरिक्षक राजेंद्र कुटे यांनी तात्काळ पथक तयार करुन अर्जुनच्या जवळच्या मित्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
अर्जूनसोबत नेहमी असणारे मित्र निथिलेश रणजित रावत व अनिस रईस मोहम्मद हे दोघे सायंकाळपासुन घरी नसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी निखिलेशचा शोध घेवुन त्यास विचारपुस केली. मात्र, सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेवून त्याच्याकडून सविस्तर माहीती घेतल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. गौरव चौधरी, जाफर मोमीन, साहील तायडे, अनिस मोहम्मद, गौरव चौधरी व निखिलेश याने अर्जुनला शंकर नगर परीसरात जाफर मोमीन याच्या भंगारच्या गोडावुनमध्ये ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावर हवालदार नवनाथ पवार, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, मंगलसिंग सोनवणे यांनी तात्काळ शंकर नगर गाठले. यावेळी सदर भंगार गोडाऊनच्या शटरला कुलुप लावुन बंद केलेले त्यांना दिसून आले. पोलीसांनी मोबाईलमध्ये व्हीडीओ शुटींग सुरु करत शटरचे लॉक तोडुन गोडाऊनमध्ये प्रवेश केला.
आतमध्ये अर्जुन याचे हातपाय बांधुन व त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबुन डोक्यापासुन ते गळ्यापर्यंत चिकट पट्टीने पॅक केलेले दिसून आले. पोलीसांनी त्याचे हातपाय सोडुन तोंडातील बोळा काढला असता अर्जूनला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जाफर मोमीन, साहील तायडे यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.
तसेच त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक कुटे यांनी दिली आहे. अपहरण झाल्यापासुन अवघ्या सहा तासांच्या आत शोध घेवुन अपहृत मुलाची सुटका करुन आरोपीतांचा शोध घेवुन त्यांस अटक केल्याने सिन्नर पोलिसांच्या या चमकदार कामगिरीचे कौतुक होत आहे.